घोटुल: जगण्याची विलक्षण शाळा - वीरा राठोड
शिकार, नृत्य, गीत, संगीत, क्रीडा आदी कौशल्यापासून कामक्रीडेपर्यंत भावी आदर्श जीवनासाठीचे सर्व प्रकारचे शिक्षण देणारी आदिम जमातींची घोटुल ही अतिप्राचीन शाळा आहे. जिथे आयुष्याचा जोडीदार निवडण्यापासून अनुशासन, कर्तव्य आणि समूहनिष्ठा आदींचे संस्कार केले जातात...
मानवी जगणे जेवढे आदिम, या जगण्याविषयीच्या धारणादेखील तेवढ्याच प्राचीन नि विलक्षण स्वरूपाच्या. त्यातील अगणित मानवी स्मृतींच्या पल्याड गेलेल्या, असंख्य कालबाह्य झालेल्या, तर अनेक धारणा आजच्या आधुनिक युगातही आपली मुळं घट्ट धरून अस्तित्वात असलेल्या दिसतात. अशा पिढीजात परंपरांमधून चालत आलेल्या सर्वच जीवनधारणांमधील सारंच काही काळाच्या कसोटीवर टिकेल, असंही नाही. परंतु अगदीच सारं कालबाह्य आहे, असंही निष्ठूरपणे म्हणता येत नाही. यातील बऱ्याच रीतिभाती या कितीही जुन्या वा नागर परंपरेपासून भिन्न आदिम जगण्यातल्या असल्या तरी त्या काळाशी सुसंगत आणि तितक्याच महत्त्वाच्या ठरू लागतात. अशाच प्रकारची आदिवासी जगण्यातली ‘घोटुल’ ही संस्था. समाज-संस्कृती-जीवन शिक्षणाचे धडे देणारी संस्था म्हणून तिच्याकडे बघता येईल.
घोटुल आणि आदिवासी यांचं असं काही एक अभिन्न नातं राहिलं आहे की, घोटुलसारख्या आदिवासी जगताने निर्माण केलेल्या संस्थेचा विचार केल्याशिवाय आदिवासींच्या अनेक बाबींचे अध्ययनच करता येणार नाही.
भारतीय आदिवासींच्या या वैशिष्ट्यपूर्ण घोटुल संस्थेविषयी मात्र आपला शिक्षित, नागरी समाज जेव्हा काही लिहितो, बोलतो, तेव्हा त्याचा कटाक्ष हा इतर बाबींना दुर्लक्षून घोटुलमधील लैंगिक संबंधावरच अधिक राहिला आहे. या मुख्यधारेतल्या समाजाने सामूहिक व्यभिचार, अनैतिकता या दृष्टीनेच पाहिले आहे. परंतु एखाद्या परंपरेच्या खोलात न जाता केवळ वरवरच्या निरीक्षणावरून भाष्य करणे आदिवासी परंपरा आणि समाज संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब ठरते. घोटुलचा विचार करत असताना आज आमच्या वर्तमान आधुनिक समाजाने निर्माण केलेल्या ‘लिव इन’, ‘अफेअर्स’, ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’, ‘मुक्त लैंगिक जीवन’, ‘बहुपत्नीत्व’ अशा धारणा या केवळ शारीरिक, लैंगिक गरज, वासनेची तृप्ती, मौजमजा, मस्ती, लैंगिक स्वैराचार या पलीकडे नसताना घोटुलसारख्या जगण्याचे, संस्कृतीचे संस्कार करणाऱ्या संस्था निश्चितच प्रशंसनीय ठरतात. जेव्हा मानवी जीवनात एखादी सामाजिक संस्था जगण्याच्या अपरिहार्यतेतून, समाजमान्यतेनुसार, समाजशिक्षेचा, समाजहिताचा विचार करून उदय पावते, हजारो वर्षे टिकून राहते, त्या अर्थी तिचे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही.
महाराष्ट्रात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागात माडिया, माडिया गोंड, परधान, हलबा या जमातींचे घोटुल आम्हाला परिचित आहेत. परंतु भूतानपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, म्यानमार, मलेशिया, मलाया, आफ्रिका आदी देशांत घोटुल सदृश संस्था आदिवासी जमातीत आढळतात. भारतात हिमालयातल्या ‘भेदिया’पासून पूर्वोत्तरच्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील गारो, नागा, आओंपर्यंत. मध्य भारतातील बस्तर, आबुझमाड, छोटा नागपूर, गोंडवनापासून दक्षिण भारतापर्यंत घोटुलचे विविध प्रकार नाना रूपात अाढळतात. अशा संस्था संपूर्ण भारतात प्रचलित होत्या. आजही अनेक अतिदुर्गम भागात त्या अस्तित्वात असलेल्या अाढळून येतात. माडिया, माडिया गोंड, गोंड, परधान, बैगा, परजा, भतरा, हलबामध्ये ‘घोटुल’ मुंडा आणि हो मध्ये ‘गितिओरा’ उरावंमध्ये ‘जोख, धुमकुरीया’ गारो (नाकपंधे), नागा (मोरुंग), आओ (राशेग), भेदिया (रंगबंग), मिझोराम (कोन्यक, झाब्लबुक) आदी नावाने परिचित आहेत.
घोटुलचे स्वरूप हे सार्वजनिक स्वरूपाचे झोपडीवजा ‘युवागृह’ आहे. जिथे १०व्या वर्षानंतर ते १६व्या वर्षापर्यंत अविवाहित तरुण (चेलीक)-तरुणी (मोटियार) यांना अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली जीवनाचे धडे दिले जातात. रीतिरिवाज, कृषीचे कसब शिकवले जाते. शिकार, नृत्य, गीत, संगीत, क्रीडा आदी कौशल्यापासून कामक्रीडेपर्यंत भावी आदर्श जीवनासाठीचे सर्व प्रकारचे शिक्षण देणारी आदिम जमातींची अतिप्राचीन शाळा आहे. जिथे आयुष्याचा जोडीदार निवडण्यापासून अनुशासन, कर्तव्य आणि समूहनिष्ठा आदींचे संस्कार केले जातात. घोटुल हे गावाच्या मधोमध अथवा एका बाजूला असते. जिथे फक्त तरुण अविवाहित मुलं आणि मुली (चेलीक-मोटियार) एकत्र राहतात. बऱ्याच जमातींमध्ये मुलांसाठी वेगळे व मुलींसाठी वेगळे घोटुल असते. काही जमातींमध्ये तरुणींनी घोटुलमध्येच रात्रीला झोपावे, असा आग्रह दिसत नाही; तर अधिकतम जमातींमध्ये तसे बंधकच आहे. घोटुलमध्ये न येणाऱ्याला आदिवासी मुलं-मुली देत नसत.
घोटुलची रचना तीन भागांत विभागलेली असते. एक चोहोबाजूने कुंपण घातलेले विस्तीर्ण असे अंगण; जिथे रोज सांजरातीला जाळ पेटवून नृत्य, गाणे, गावाचे उत्सव होतात. चेलीक आणि मोटियार (तरुण-तरुणी) बाहुत बाहू घालून नाचतात, थट्टा-मस्करी करतात. दुसरा भाग मुख्य शयनगृहाच्या बाहेरची ओसरी. या ओसरीत चेलीक आणि मोिटयार गप्पा मारत बसतात. रात्री चेलीक इथेच झोपतात. आणि तिसरा भाग म्हणजे मुख्य शयनगृह. या शयनगृहातही एक आतली खोली आणि एक बाहेरची असते. बाहेरच्या खोलीत मोटियार झोपतात आणि आतली खोली ही ज्या चेलीक-मोटियारचे प्रेमबंध जुळलेत त्यांना प्रणयाराधनेसाठी असते. पावसाळ्याच्या दिवसात चेलीक बाहेरच्या खोलीत आणि मोटियार आतल्या खोलीत झोपत. खोलीच्या वरच्या बाजूला, भिंतींवर, खांबाला वाद्ययंत्रे, शिकारीची शस्त्रे आणि इतर जीवनावश्यक साहित्य ठेवलेले असते.
‘घोटुल’ची निर्मिती आदिवासींचे देव लिंगो देव यांनी केली, अशी सर्वमान्यता आहे. अर्थात हे लिंगोपॅन भगवान शंकराचेच अवतार मानले जातात. त्यांचा या संस्थेच्या निर्मितीमागे तरुणांना जगण्याचे शिक्षण देणे हा हेतू होता, असे आदिवासी मानतात. तर अभ्यासक या उद्देशाबरोबरच आदिवासींना संभोगासाठी एकांत मिळावा यासाठीही घोटुल निर्माण झाले असावेत, अशी मते नोंदवतात. दिवसभर दैनंदिन कामे आणि रात्रीला नृत्य, गाणे असा घोटुलचा दिनक्रम ठरलेला असतो. तिथे गावाच्या बैठका होतात. त्यांचे उत्सव, समारंभ, शोकसभा आदी होतात. इथे गावातील सामाजिक कार्ये, विवाह, मृत्यू, श्रमदान आदी सामूहिकरीत्या पार पाडले जातात. तरुणांना सामाजिक उत्तरदायित्वाची शिकवण, उपवरांना विवाहापूर्वी स्त्री-पुरुष संबंधांची शिकवण, कला, हस्तकलांचे ज्ञान दिले जाते. संकटांचा सामना एकदिलाने, एकजुटीने करायचे शिकवले जाते.
नीतिनियमांनुसार जीवनाचरण करायला लावले जाते. आपल्या देवीदेवतांची नियमित सामूहिक पूजा करणे बंधनकारक असते. घोटुलमधील वास्तव्याच्या काळात सर्व सदस्यांना स्वतंत्र नावे दिली जातात. वयस्क झाल्यावर ते आपला जीवनसाथी शोधतात. चेलीकांनी यासाठी लाकडाची वा बांबूची फणी तयार करायची असते. जेव्हा एखाद्या मोटियारला चेलीक आवडतो, तेव्हा ती चेलीकच्या केसातील फणी काढून आपल्या केसात घालते. मगच त्यांचे शरीरसंबंध प्रस्थापित होतात. त्यानंतर त्यांचा विवाह होतो, अशी ही प्रेमविवाहाची पद्धत आहे. ज्यात हुंड्यासारख्या कोणत्याच पद्धती नसतात. जोपर्यंत मनासारखा जोडीदार मिळत नाही तोपर्यंत ते अनेकांसोबत असे संबंध प्रस्थापित करू शकतात. अर्थात, एका वेळी एकच. आणि विवाहानंतर काडीमोड घ्यावा वाटला तर अगदी सहज घेता येऊ शकतो. घोटुलमध्ये असताना एखादी मोटियार गर्भवती राहिली तर तिला ज्या चेलीकपासून गर्भधारणा झाली, त्याच्यासोबत लग्न लावून दिले जाते. घोटुलमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनीही घोटुलमधील इतरांसोबतचे शरीरसंबंध विसरून नवीन आयुष्य जगायचे, अशी शिकवण दिली जाते. घोटुलचे नियम तोडल्यावर मार्गदर्शक, सिरदार, कोटवार यांच्या यंत्रणेकडून कठोर स्वरूपाची शिक्षाही दिली जाते.
एकूणच घोटुलसारख्या आदिम संस्थेच्या माध्यमातून आदिवासींनी कोणते आदर्श निर्माण केले, याचा शोध घेतल्यास लक्षात येते, आपापसात बांधिलकी, परोपकार, सहकार्याची भावना, मिसळून राहण्याची, आयुष्यभरासाठी जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य, आदर्शवत जीवन जगण्यासाठीचे सर्व संस्कार, शिकवणी, कसलाच भेद न करता समान पातळीवर देण्याचा संघ भावनेचा आदर्श घालून दिला. हे सर्व अनुभवकेंद्री होते. कृतीयुक्त होते. विशेष करून स्त्रीला या परंपरेने सर्वतोपरी स्वातंत्र्य बहाल केल्याने स्त्री-पुरुष समानतेचे घोटुल एक घोतक आहे. घोटुलच्या तुलनेत आमचे मुख्य धारेतील शिक्षण कितीतरी मागे राहिल्यासारखे वाटून जाते. अशा प्रकारचे घोटुल आज मागे पडत चालले आहेत. नामशेष होत आहेत. परंतु वर्तमान परिस्थितीतदेखील घोटुलसारखी संस्था काही बदल करून सामाजिक एकोपा, समता, अधिकारांचे स्वातंत्र्य, मानवतेच्या दृष्टीने न्यायिक आणि उपयुक्त ठरू शकतात. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बदलत्या काळाबरोबर आम्ही त्यांचा स्वीकार करू शकलो नाहीत, म्हणून अशा संस्कारक्षम आदिम जीवनधारणांना हिणवण्यात, नावे ठेवण्यात काहीच अर्थ उरत नाही. हे मोठं मन करून मान्यच करावे लागेल.
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment