पण बाई झुकली नाही

पण बाई झुकली नाही
सोनी सोरी हे नाव सर्वसामान्य मराठी लोकांना फारसं परिचीत नाहीपण नक्षलवादी चळवळीची माहिती असलेल्या लोकांना या नावाविषयी आदर आहेछत्तीसगढमध्ये एका आदिवासी आश्रम शाळेत त्या शिक्षिका आहेतस्वतः आदिवासी आहेतत्यांच्या नव-याला नक्षलवादी म्हणून पोलिसांनी अटक केली आणि मग त्यांच्या अनन्वित अत्याचाराची कथा सुरू झालीसोबतच त्यांच्या संघर्षाचीहीएकटा माणूस काय करू शकतो असं ब-याचदा उपहासानं किंवा अगतिकतेनं म्हटलं जातंपण ज्याच्याकडे सत्याची ताकद असते त्याला कोणी पराभूत करू शकत नाहीसोनी सोरी यांनी हे पुन्हा एकदा जगाला पटवून दिलं आहेमुंबईच्या येशू पाटील यांच्या ‘शब्द प्रकाशना’मार्फत ‘मेरी पाटील स्मृती पुरस्कार’ देऊन सोरी यांचा नुक्ताच सन्मान करण्यात आलामेरी पाटील या स्वतः तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्या होत्यात्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पती श्री येशू पाटील यांनी हा पुरस्कार सुरू केलात्यानिमित्तानं माआमदार कपिल पाटील यांनी लिहिलेला हा लेख ‘वुमनविश्व’च्या वाचकांसाठी.
सोनी सोरी तिचं नाव. आदिवासी आश्रम शाळेतल्या शिक्षिका. छत्तीसगडच्या दंतेवाड्यातल्या. तिच्या नवऱ्याला पोलिसांनी बेदम मारलं. नक्षलवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं. पोलिसांचे अत्याचार इतके निर्मम होते की, अनिल कोमातच गेला. जिवंत राहू शकला नाही. मग सुरू झाले सोनी सोरीवरचे अत्याचार. तीच मारहाण. तिला निर्वस्त्र केलं जायचं. त्याच अवस्थेत कोठडीत डांबून ठेवलं जायचं. तिच्या गुप्तांगात खडी कोंबण्यापर्यंत मजल गेली. विजेचे शॉक दिले गेले. पण बाई झुकली नाही. पोलिसांचं म्हणणं एवढंच होतं, आम्ही सांगू त्या कागदपत्रावर सही कर. पोलिसांना अरुंधती रॉय आणि हिमांशू कुमार यांना नक्षलवादी ठरवायचं होतं. त्यासाठी सोनीची मदत हवी होती. अरुंधती रॉय जागतिक कीर्तीच्या लेखिका आणि पत्रकार. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज'च्या लेखिका. 'मॅन बुकर प्राईज'च्या विनर. सोनी सोरीनं पोलिसांना नकार दिला. सगळे हाल भोगले. पण पोलिसांना ती शरण गेली नाही.
सोनी सोरी स्वतः आदिवासी. आदिवासी कार्यकर्त्यांना एकतर सत्ताधाऱ्यांना शरण जावं लागतं. नाहीतर नक्षलवादी म्हणून पोलिसांचा मार खावा लागतो. अन् ते छत्तीसगडमधले असतील तर त्या अत्याचारांना सीमा नाही. सोनी सोरी तर दंतेवाड्यातल्या समेली गावच्या. राजकीयदृष्ट्या जागरूक घरातल्या. वडील सरपंच. तर काका कधी काळी सीपीआयचे आमदार राहिलेले. सोनी सोरी मात्र गांधीवादी. शिक्षण पूर्ण करताच त्यांनी आदिवासी मुलांसाठीच शिक्षक होण्याचं ठरवलं. दंतेवाड्यातल्या जाबेली गावात सरकारी निवासी शाळेत त्या शिक्षिका झाल्या. पण त्यांच्यातली सामाजिक कार्यकर्ती केवळ शिक्षिका म्हणून कशी राहणार? पोलिसी अत्याचारात किंवा नक्षली संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या आईबापांच्या मुलांना त्या आपल्या शाळेत उचलून आणू लागल्या. ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी सोनी सोरी आई बनल्या. पण दंतेवाडा पोलिसांना ते मान्य नव्हतं. नेहमीप्रमाणे सोनी सोरींना नक्षलवादी ठरवण्यात आलं.
या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार काही मदत करत नव्हतं. मग सोनीबाईंनी आपल्याच पगारातून त्यांचं भागवायचं ठरवलं. मुलं आईवडील नसण्याचं दु:ख विसरून शिकायला लागली, तोच नक्षलविरोधी पथकाने सोनी सोरींच्या वसतिगृहावरच हल्ला चढवला. बाईंना अटक झाली. सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं. अत्याचारांची मालिका सुरू झाली. अटक झालेल्या सोनी सोरींना दोन दिवसांनी मॅजिस्ट्रेट पुढे उभं करण्यात आलं, तेव्हा त्या मरणासन्न होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या गुप्तांगातून तीन खडे बाहेर काढले होते. पण या अत्याचारांची दखल खालच्या कोर्टाने घेतली नाही. अखेर सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका झाली.
सुटकेनंतर सोनी सोरी यांनी आपल्या शाळेतल्या मुलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मुलं मिळाली नाहीत. पण त्यांचा निरोप त्यांच्या बाईंपर्यंत पोचला होता. 'बाई आम्हाला शोधू नका, आम्ही माओवादी बनलो आहोत.'
छत्तीसगड सरकारच्या दमण यंत्रणेपुढे एक शिक्षिका हरली होती.
येशू पाटील यांच्या शब्द पब्लिकेशनमार्फत 'मेरी पाटील स्मृती पुरस्कारा'ने सोनी सोरी यांना नुक्तच गौरवण्यात आलं. २५ हजार रुपये रोख आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठी साहित्य विश्वात शब्द प्रकाशनाला वेगळं स्थान आहे. पत्नीच्या निधनानंतर येशूने हा पुरस्कार सुरू केला. हा दुसरा पुरस्कार. ज्येष्ठ विचारवंत पुष्पाताई भावे यांच्या हस्ते या वेळी तो देण्यात आला. रविवार असूनही गर्दी बरी होती. त्यापेक्षा त्यात दर्दींची संख्या मोठी होती. डॉ. आनंद तेलतुंबडे, छाया दातार, अरुणा पेंडसे, अनंत सामंत, नीरजा, मेघना पेठे, राहुल कोसंबी, नितीन वैद्य, डॉ. आशीष देशपांडे, प्रकाश अकोलकर, प्रतिमा जोशी, विवेक गोविलकर, अशोक राजवाडे, डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्रा. केशव परांजपे अशा मराठीतल्या लेखक मंडळींची गर्दी होती. बेझवाडा विल्सन यांचं भाषण हे त्या सगळ्यांसाठी आकर्षण होतं
बेझवाडा विल्सन यांची लढाई माणुसकीला लाज वाटणाऱ्या प्रथेविरोधात आहे. आजही देशात दीड लाखांहून अधिक सफाई कामगार हाताने मैला साफ करतात. डोक्यावरून मैला वाहून नेतात. बेझवाडाचा जन्मसुद्धा कर्नाटकातल्या अशाच एका पूर्वास्पृश्य जातीत झाला. थोटी जातीत. त्या प्रथेच्या विरोधात त्यांना पहिला संघर्ष करावा लागला तो घरातच. आपल्या जातीतच. जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य हे आहे की, प्रथा कितीही अपमानास्पद अवहेलना करणारी असो, घृणास्पद असो ती पूर्वसंचितांचा भाग म्हणून जातीने स्वीकारलेली असते. ती गुलामी त्याच्या जाणीव, नेणीवेचा भाग बनलेली असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी कामं सोडून देण्याचा आदेश दिला. महाराष्ट्रातल्या पूर्वास्पृश्य समाजाने त्यांचं ऐकलं. पण देशात आणि अगदी महाराष्ट्रातही सफाई क्षेत्रातल्या काही जाती त्या व्यवसायात अजूनही अडकून आहेत. १०० टक्के आरक्षण असल्यासारख्या. विल्सन सांगत होते की, सीमेवर जितके जवान मरतात त्याहून अधिक सेप्टीक टँकमध्ये पडून मरतात. गुदमरून मरतात. माणसाचा मैला दुसऱ्या माणसाने हाताने साफ करायचा. डोक्यावरून वाहून न्यायचा ही प्रथा काल परवापर्यंत काही वर्षांपूर्वी मुंबईतही होती. मुंबई महापालिकेचे कामगार मैला उपसून वाहून नेताना मी स्वत: पाहिलं आहे. ती सगळी घाण त्यांच्या अंगावर पडत असे. तरीही निमूटपणे ते काम करत असत. बाबासाहेबांना चीड होती ती या निमूटपणाची. आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या बेझवाडा विल्सन यांना चीड आहे तीही याच निमूटपणाची. महाराष्ट्राचं सरकार त्या घाणीतून या माणसांना बाहेर काढण्याऐवजी त्यांच्या मुलांना तेच काम प्राधान्याने आरक्षणाने देण्याची व्यवस्था करतं आणि आपण ते निमूटपणे मान्य करतो. आपल्या सार्‍यांसाठी हे लज्जास्पद आहे. बेझवाडा विल्सन हे सांगत होते, तेव्हा ऐकताना पुन्हा पुन्हा स्वत:ची शरम वाटत होती.
- कपिल पाटील
kapilhpatil@gmail.com
(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. ३० नोव्हेंबर २०१६  

0 comments :

Post a Comment

Thanks for your comment

 


Our School

Shri Gadge Maharah Ashram School, Otur is more than a home away home for our students. It is a place where we build the characters with the thoughts of Saint Gadge Maharaj.

Popular Posts

Blog Archive







Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews






Featured Post

श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

     श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वात...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • Wings of Fire
  • Hamlet
  • BHALAR

Followers

External Links