Education



  • संत गाडगेबाबा

    ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!

    गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.


    १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.


    दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.


    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.


    देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.


    त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.


    संक्षिप्त चरित्र -


    गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
    ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
    १९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
    १९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
    १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
    "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
    फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
    गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
    १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
    गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
    "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
    आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
    १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
    १९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
    गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
    डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.



    गाडगेबाबा जाऊन आता ४० वर्षे झाली. स्वच्छतेची, साफसफाईची बाबांना खूपच आवड होती. हातात झाडू घेऊन ते सतत साफसफाई करीत असत. गाडगेबाबा म्हणजे मूर्तिमंत कडकडीत वैराग्य ! जनसेवेसाठी सर्वार्थाने झोकून दिलेले आयुष्य, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कळवळणारी कनवाळू वृत्ती, हातात एक झाडू , झाडू नसेल तेव्हा काठी. झाडू घेऊन कुठेही घाण दिसली, कचरा दिसला की तो स्वत: दूर करावयाचा, स्वत: झाडलोट करावयाची, हा बाबांचा नियम. बाबा कोणाला नमस्कार करू देत नसत. त्यांच्या पायाला कोणी हात लावलेला त्यांना चालत नसे. त्यातही कोणी पुढे घुसून पायापर्यंत येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला हातातल्या काठीचा प्रसाद मिळे.


    बाबांभोवती एक गूढतेचे वलय होते. आपल्याकडे कोणीही माणूस मोठा झाला की वेगवेगळ्या चमत्कारांच्या पताका त्याच्या नावाने उभारलेल्या जातात. तो चारचौघांसारखा नाही, हे सांगण्यासाठी त्याला दैवी अवतारांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी अहमहमिका सुरू होते. गाडगेबाबा हातात फुटक्या मडक्याचा तळ घेऊन फिरत. त्यांच्या अंगावर फाटक्या चिंध्या शिवून तयार केलेला अंगरखा असे. श्रेष्ठ पुरुषांशी बाबांचे फार चांगले संबंध होते. लोकशिक्षणावर बाबा खूप भर देत. बाबांनी समाजसेवेचे फार मोठे काम केले. धर्मशाळा बांधल्या. लोकांच्या सोयीसाठी शाळा बांधल्या, रुग्णालये बांधली, नद्यांना घाट बांधले. बाबा जेथे असतील त्या गावात रात्री कीर्तन हा एक वेगळा अनुभव होतो. तो समाजसुधारणेचा एक पाठच असे.


    लोकांनी जातिभेद पाळू नयेत, धार्मिक उत्सवासाठी वा नवसपूर्तीसाठी किंवा लग्नकार्यासारख्या समारंभासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करू नये. ऋण काढून सण साजरे करू नयेत, या गोष्टींवर बाबांचा कटाक्ष होता आणि बाबा लोकांना सहज समजेल अशा भाषेत हे सुधारणेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवीत.


    सत्यनारायणाच्या कथेत साधुवाण्याची होडी सत्यनारायणाची पूजा केल्यावर
    पाण्यावर आली, या उल्लेखाची बाबा खिल्ली उडवीत. ते म्हणत, आपल्या सरकारला हे कसे माहीत नाही ? इतक्या बोटी बुडाल्या, सत्यनारायणाची पूजा घालून आणि देवाचा प्रसाद खाऊन त्या बोटी वर का नाही काढल्या ?

    देवासमोर कोंबडी, बकरी बळी देतात ते बाबांना मुळीच आवडत नसे. देवापुढे बकरे कापणार्‍यांना ते त्यांच्या तोंडावरच नावे ठेवीत. बकरीचे पिल्लू कापताना आनंद मानता मग स्वत:चे पोर गेल्यावर का रडता ? असा अगदी मर्मभेदी प्रश्न बाबा विचारीत.


    हिन्दू, मुसलमान एकच आहेत, ते सांगताना बाबा अगदी लहान लहान प्रश्न विचारीत. तुमच्या रक्ताचा रंग कसा ? ' लाल '. देहत्याग केल्यावर या शरीराचे काय होते? 'माती'. जे हिन्दूंच्या शरीराचे होते तेच मुसलमानांच्या शरीराचे होते, मग हिन्दू आणि मुसलमान यात भेदाभेद कशाला? बाबांच्या अशा बोलण्याने लोक अंतर्मुख होत.


    त्या वेळेपुरता बाबांच्या शिकवणुकीचा जनसामान्यावर चांगला परिणाम होई, पण समाजाला शतकानुशतके पडलेले वळण चिरस्थायी बदल घडू देत नसे. समाजाचे पुन्हा ' ये रे माझ्या मागल्या ' चालूच असते.



    संत गाडगेबाबाची कीर्तन शैली -


    घबाड मिळू दे मला...

    घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
    अरं भंडार वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
    ( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)

    बारा कोसावर एक वाळी आहे, तिथं एक मारावाळी आहे,
    त्याचा मोठा वाळा आहे, अन्‌ त्यावर महादरो आहे
    आता पाहू दे मणभर सोनं मला रं भंडार वाहीन तुला

    ( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)

    मणभर सोनं ह्याले पाहिजे
    ( कोणासाठी ?... स्वत:साठी ..)
    अन्‌ खंडोबाले देणार काय ?
    हयद नुसती दोन चिमटी !
    ( बाप्पा हा सौदा झाला )

    लेकरू होऊ दे मले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
    बकरू कापीन तुले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले

    ( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )

    मी अन्‌ माह्या दोन सवती कोन्या एकीलेही नाई संतती
    त्याहींच्या आंधी कुरपा कर माह्यावरती
    लोटांगण घालतो तुह्या पायावरती

    ( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )

    दगडाचा देव घेत नाही देत नाही
    पापाची साथ कुणी करत नाही
    नवसानं पोर कोणाले होत नाही
    माणुस खादाळ देव काही मांगत नाही
    देव म्हनता का धोंड्याला ?
    धान म्हनता का कोंड्याला ?
    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ...


    आसमंतातील, परिसरातील घाणकचरा एकदा- दोनदा झाडून टाकला, तरी तो परत परत जमा होतोच. लोकांच्या मनातील कुविचारांचा कचरा आणि तण बाजूला केले, तरी परत तेथे उगवतेच. समाजमनामध्ये चांगले विचार रुजविण्याचे प्रयत्न सातत्याने चालू राहिले पाहिजेत. - असे प्रयत्न मनोभावे करणारे गाडगेबाबा वारंवार जन्म घेत नसतात हेच सत्‍य.

    अश्या या महान संतांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (गाडगेनगर) अमरावती येथे स्मारक आहे.

    सबंध महाराष्ट्र नतमस्तक या खऱ्या संतापुढे ....!!!!!





0 comments :

Post a Comment

Thanks for your comment

 


Our School

Shri Gadge Maharah Ashram School, Otur is more than a home away home for our students. It is a place where we build the characters with the thoughts of Saint Gadge Maharaj.

Popular Posts

Blog Archive







Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews






Featured Post

श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

     श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वात...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • Wings of Fire
  • Hamlet
  • BHALAR

Followers

External Links