श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतुरचे आपले कीर्तिवंत विद्यार्थी....

श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतुरचे आपले कीर्तिवंत विद्यार्थी....


'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ' शिवजन्मभूमीचे डॉ. रामदास डामसे

जागतिक पातळीवर कोणत्याही देशाचे सामर्थ्य त्या देशाची सैन्यशक्ती आणि विज्ञान - तंत्रज्ञानातील प्रगती यावरून अधोरेखित होत असते. देशाची संरक्षण क्षमता आणि विज्ञान तंत्रज्ञानाची क्षमता परस्पर सहयोगाने प्रगतीकडे झेपावत असतील तर तो देश अधिक बलवान होतो. भारताच्या संरक्षण क्षमतेला मजबूत करण्यासाठी 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' DRDO या संस्थेचे मोठे योगदान राहिले आहे. या DRDO संस्थेत भारताची सुरक्षा व्यवस्था सामर्थ्यशाली करण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही क्षेपणास्त्रे बनविण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे 'इंटरनॅशनल सायंटिस्ट ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविलेले जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रामदास सावळेराम डामसे हे शिवजन्मभूमीतील सुपुत्र होते. डॉ. रामदास डामसे यांनी DRDO साठी विविध प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण करून भारतीय संरक्षण व्यवस्थेला सक्षम बनविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. रामदास डामसे यांचे 'हाय एनर्जी मटेरिअल्स' या विषयातील साठ संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. जगातील अनेक नामांकित संशोधन संस्थांकडून डॉ. डामसे यांना प्रलोभने दाखवली गेली पण केवळ पैशांसाठी स्वदेश सोडून परदेशात जाणे त्यांना पसंत नव्हते. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी आणि समाजासाठी झाला पाहिजे हे जीवनमूल्ये त्यांनी आयुष्यभर जपले.

डॉ. रामदास डामसे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील तळेरान या छोट्याशा खेड्यात दिनांक १ ऑगस्ट १९५८ रोजी झाला. मूळगाव इंगळूण असले तरी वडिल सावळेराम नागुजी डामसे तळेरान येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने पत्नी सखुबाईंसह तेथेच वास्तव्यास होते. वर्षभरातच गुरूजींची बदली निमगिरी गावी झाल्याने डामसे कुटुंबांने मुक्काम हलवला. गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली सतत पाच वर्षे निमगिरी शाळेचा १००% निकाल आणि एक विद्यार्थी जुन्नरमध्ये पहिला असा पायंडा सुरू झाला. निमगिरी शाळेची प्रगती पाहून इंगळूण ग्रामस्थांनी आपल्या सावळेराम डामसे गुरूजींची विद्या विकास मंदिर, इंगळूण या शाळेत बदली करून घेतली. बालपणात रमलेल्या आणि निमगिरी शाळेत जायला उत्सुक असलेल्या डॉ. रामदास डामसे यांना विद्या विकास मंदिर, इंगळूण या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. पाचवीनंतर सातवीपर्यंत वडिलांचा विद्यार्थी असलेल्या डॉ. रामदास डामसे यांना हुशार असूनही कधीच पहिला क्रमांक पटकावता आला नाही याचे गुरूजींनाच जास्त वाईट वाटत असे. सावळेराम डामसे गुरूजींनी सर्वोतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन केलेल्या डॉ. गोविंद गारे या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती पाहून डॉ. रामदास डामसे यांना गुरूजींनी आठवी इयत्तेत महात्मा गांधी हायस्कूल, मंचर येथे प्रवेश घेतला. मंचरला वसतिगृहात सोडून येताना गुरूजींनी रडवेल्या झालेल्या डॉ. रामदास डामसे यांना पाठीवर हात फिरवत, 'मला खात्री आहे, आता तू चमकशील आणि पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होशील' असे ठामपणे सांगितले.

खरोखरच पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ. रामदास डामसे यांनी मात्र नववीसाठी जुन्नरला येण्याचा हट्ट धरला आणि नाईलाजाने गुरूजींना सह्याद्री म्हणजे आजचे कृष्णराव मुंढे हायस्कूलमध्ये प्रवेश घेणे भाग पडले. दहावीला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने गुरूजींनी संत गाडगे महाराज विद्यालय, ओतूर येथे डॉ. रामदास डामसे यांना प्रवेश घेतला आणि वसतिगृहात राहण्याची सोय केली. या विद्यालयाचे संचालक पी. एम. पाटीलसर यांची डॉ. रामदास डामसे यांनी विशेष मर्जी संपादन केली आणि पाटील सरांनीही आपल्या या लाडक्या विद्यार्थ्यांला व्यक्तीगत मार्गदर्शन केले. सन १९७५ साली जुनी अकरावी शेवटच्या बॅचचा निकाल जाहीर झाला आणि डॉ. रामदास डामसे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, परंतु पाटील परिवाराशी जुळलेला स्नेह आज पन्नास वर्षांनंतरही कायम आहे. ओतूर काॅलेजमध्ये पहिल्या वर्षाला विज्ञान शाखेत डॉ. रामदास डामसे यांनी प्रवेश घेतला तो प्रथम क्रमांक कायम ठेवण्याचा निश्चय करूनच. द्वितीय वर्षात परिक्षा फाॅर्म भरण्याची तारीख टळून गेली तरी रामदास डामसे या हुशार विद्यार्थ्याने पैशांअभावी फाॅर्म भरला नसल्याचे प्राचार्य वसंतराव जगताप यांच्या निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशी प्राचार्य महोदयांनी स्वतःच्या खिशातून फी रक्कमेसह युनिव्हर्सिटीतील राम जगदाळे यांना चिठ्ठी लिहून डाॅ. रामदास डामसे यांचा परिक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा केला आणि हा विद्यार्थी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

काही कारणास्तव डाॅ. रामदास डामसे यांनी B Sc च्या अंतिम वर्षासाठी पुण्यातील माॅडर्न काॅलेजला प्रवेश घेतला आणि खेड्यातून विद्येच्या माहेरघरात आलेला हा विद्यार्थी काॅलेजमध्ये पहिला आला. पुण्यातील स. प. महाविद्यालयात M Sc अभ्यासक्रम सुरू असतानाच डॉ. रामदास डामसे यांची 'राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा' या संस्थेत ज्युनिअर शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. यथावकाश पदवी हातात पडून नवीन कामाची सुरुवात झाली आणि त्याच वर्षी सन १९८२ मध्ये नाशिक येथे शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या माधवराव पागे यांच्या BSc असलेल्या सुकन्या कुमारी रेखा यांच्याशी डाॅ रामदास डामसे यांचा विवाह झाला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी मिसाईल विभागातील भारताची प्रगती फारशी समाधानकारक नसल्याने सन १९८३ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इस्त्रो सोडून डीआरडीओमध्ये (DRDO) येण्यास भाग पाडले. भारताची सुरक्षा व्यवस्था सामर्थ्यशाली बनविण्यासाठी अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी 'इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम' (IGMDP) या प्रोजेक्टची विशेष जबाबदारी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देण्यात आली. यासाठी डॉ . ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सुचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली देशातील ऐंशी तरूण शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखालील IGMDP या प्रोजेक्टसाठी सन १९८५ मध्ये युनियन सर्व्हिस कमिशनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्वरित डॉ. रामदास डामसे यांची डीआरडीओ (DRDO) या भारत सरकारच्या संस्था खात्याच्या एचईएमआरएल (HEMRL) पुणे येथील प्रयोगशाळेत नियुक्ती झाली. डॉ. रामदास डामसे हे या पदावर नियुक्त झालेले संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाचे पहिलेच शास्त्रज्ञ होते. या कालावधीत डॉ. कलाम यांच्या बरोबर जवळून काम करण्याची संधी डॉ. डामसे यांना मिळाली. डॉ. कलाम हे DRDL हैद्राबाद येथे कार्यरत असत. सन १९८५ - १९९२ या कालावधीत अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. या सर्व क्षेपणास्त्रांच्या परिक्षण चाचणीसाठी ही सर्व ऐंशी शास्त्रज्ञांची टिम डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलामसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आयटीआर (ITR) चंदीपूर (बालासोर) येथे एकत्र येत असत. संपूर्ण टिमला मार्गदर्शन करताना कलामसाहेबांची नेतृत्व क्षमता आणि स्पिरीट या गुणांचे विशेषत्वाने दर्शन घडत असे. तसेच टिममधील प्रत्येक तरूण शास्त्रज्ञांची क्षमता आणि उणीवा यांचे अचूक निरीक्षण कलामसाहेबांकडे होते हे विशेष. डॉ. रामदास डामसे यांचे अप्रतिम प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, सेमिनारमध्ये अभ्यासपूर्वक चर्चा करणे, चिकित्सक प्रश्न विचारणे इत्यादी गुणांसाठी डॉ. कलामसाहेब आवर्जून कौतुक करायचे परंतु त्याचबरोबर खिलाडूवृत्ती बाळगा असा सल्लाही द्यायचे

यानंतर MBT - अर्जुन आणि T - ७२ टॅंक गनसाठी लागणारे प्रणोदक विकसित करण्यात तसेच भविष्यात टॅंक गनसाठी आवश्यक असणारी हाय एनर्जी प्रणोदके विकसित करण्यात डॉ. रामदास डामसे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले. सन १९८९ मध्ये MBT - अर्जुन टॅंक संदर्भात डॉ. कलामसाहेबांचे भाषण पी. एक्स. ई. बालासोर येथे संबंधित शास्त्रज्ञांसमोर आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ. डामसे यांचे एक प्रेझेंटेशन होणार होते. परंतु चहापाणी सुरू असतानाच शेवटच्या क्षणी आयोजकांनी डॉ. कलामसाहेब यांच्यासमोरच आपले प्रेझेंटेशन पाच मिनिटात संपविण्याची विनंती केल्याने चिंताग्रस्त झालेल्या डॉ. डामसे यांना डॉ. कलामसाहेबांनी, 'Don't worry, you take your own time, then after I will conclude my speech' असा मनाचा मोठेपणा दाखवत प्रोत्साहन दिले. यथावकाश अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही क्षेपणास्त्रे आणि MBT - अर्जुन आणि T - ७२ टॅंक गन यांचे चाचणी परिक्षण यशस्वी होऊन ती भारतीय संरक्षण खात्यात सामील झाली आणि सन १९९२ मध्ये IGMDP प्रोजेक्ट पूर्ण झाला. यानंतर फायटर एअरक्राफ्टसाठी आवश्यक तंत्रज्ञान निर्मिती करणे असे विविध प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करून डॉ. रामदास डामसे यांनी भारतीय संरक्षण व्यवस्थेला सक्षम बनविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. यादरम्यान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आणि ते दिल्लीला गेले.

डॉ. रामदास डामसे यांनी सन १९९७ मध्ये एचईएमआरएल (HEMRL) पुणे येथे डॉ. हरिहरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली Phd अभ्यासक्रम सुरू केला. परंतु १९९९ मध्ये डॉ. हरिहरसिंग यांची डॉ. कलामसाहेबांच्या सूचनेनुसार दिल्ली येथील नॅशनल ॲथाॅरिटी केमिकल वेपन कॅबिनेट सेक्रेटरी या उच्च पदावर नेमणूक झाली आणि डॉ. डामसे यांच्या Phd अभ्यासक्रमावर मोठेच संकट उभे राहिले. डॉ. हरिहरसिंग यांनी डॉ. डामसे यांची ही अडचण डॉ. कलामसाहेबांच्या कानावर घातली आणि त्यांनी एका क्षणात, 'एक्सपेरीमेंटल काम पूर्ण झाले असेल तर थेसिसच्या मार्गदर्शनासाठी डामसे दिल्लीला येतील आणि तुम्ही समोरासमोर चर्चात्मकपणे प्रबंध पूर्ण करा' असा सकारात्मक मार्ग सुचवला. यानंतर अनेकदा डॉ. डामसे विमानाने दिल्लीला जात आणि डॉ. हरिहरसिंग यांच्या सरदार वल्लभभाई पटेल कार्यालयात बसून चर्चात्मक पद्धतीने प्रबंधाचे काम करत असत. एकदा डॉ. डामसे प्रबंधासाठी दिल्लीला गेले असता त्यांची राहण्याची व्यवस्था डीआरडीओच्या खेळीयाळ मैदानावरील विश्रामगृहात डाॅ. कलामसाहेब रहात असलेल्या खालच्या मजल्यावरील खोलीत करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. रामदास डामसे खेळीयाळ मैदानावर माॅनिंग वाॅकला गेले असता तीन वर्षांनंतर भेटलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम त्यांची चौकशी करत आपुलकीने, 'I hope you will complete your PhD work soon' असे म्हणाले. यावरून त्यांची स्मरणशक्ती आणि आपल्या सहकाऱ्यांबद्दलची प्रेमभावना दिसून येते.

यथावकाश सन २००१ मध्ये डॉ. रामदास डामसे यांनी पुणे विद्यापीठाची 'स्टडीज ऑन नायट्रामाईन गॅप बेझड हाय एनर्जी गन ड्रापलंड' या विषयावर PhD पदवी संपादन केली. या विषयावर PhD संपादन करणारे डॉ. रामदास डामसे हे संपूर्ण भारतातील पहिले शास्त्रज्ञ होते आणि डॉ. गोविंद गारे यांच्यानंतरचे दुसरे आदिवासी सुपुत्र होते. दुसऱ्या दिवशी दै. सकाळ वर्तमानपत्रात डॉ. डामसे यांच्या फोटोसह प्रसिद्ध झालेली PhD ची बातमी ओतूर काॅलेजचे माजी प्राचार्य वसंतराव जगताप यांनी वाचली आणि ते भूतकाळातील आठवणीत रमले असतानाच फोन खणखणला... 'हॅलो... सर मी राम डामसे बोलतोय, सर...मी PhD झालो.. सर' सरांनी मनापासून अभिनंदन म्हटले आणि पलिकडून आवाज आला, 'सर... तुम्ही फी भरली नसती आणि युनिव्हर्सिटीत चिठ्ठी दिली नसती तर माझे शिक्षण S.Y. Bsc मध्येच थांबले असते...सर' आणि यानंतर खूप वेळ दोन्ही बाजूंनी कोणीही काही बोलले नाही. बावीस वर्षांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं एका पवित्र उंचीवर नेणारी ही घटना होती. सतत शाळा, काॅलेज, शिक्षक, मित्र, गाव, वसतिगृह बदलूनही डॉ. रामदास डामसे यांचा शैक्षणिक आलेख नेहमीच उंचावत राहिला. प्रथम गुरू म्हणून वडिल सावळेराम गुरूजींची जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा आणि डॉ. गोविंद गारे, आमदार कृष्णराव मुंढे, गाडगे मिशन ओतूरचे पी. एम. पाटीलसर, प्राचार्य वसंतराव जगताप, माॅडर्न काॅलेजचे प्राचार्य गंभीर, PhD मार्गदर्शक डॉ. हरिहरसिंग आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ही सर्व डॉ. रामदास डामसे यांच्या यशस्वी जीवनप्रवासातील प्रेरणास्थाने ठरली.

आजवर डॉ. रामदास डामसे यांचे विविध विषयांवरील शंभराहून अधिक संशोधनपर लेख जगभरातील मान्यताप्राप्त मासिके आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. रासायनशास्त्रातील शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ म्हणून डॉ. रामदास डामसे यांची ख्याती आहे. 'हाय एनर्जी मटेरियल' मधील संरचना आणि संवेदनशीलता यामधील परस्परसंबंध यावरील पेटंट व हाय एनर्जी गन प्रोपेलेंटचे पेटंट प्राप्त होण्याचे श्रेय डॉ. रामदास डामसे यांना आहे. 'हाय एनर्जी मटेरियल' सोसायटी सदस्य म्हणूनही डॉ डामसे यांचे भरीव योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार लाभलेले सावळेराम नागुजी डामसेगुरूजींचा मुलगा शिस्त आणि शिक्षणावरील श्रद्धा यामुळे इंगळूणसारख्या एका छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी ते शास्त्रज्ञ असा डाॅ. रामदास डामसे यांचा दैदिप्यमान प्रवास झाला आहे. सन १९८३ पासून पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील कनिष्ठ शास्त्रज्ञ सहाय्यकपासून संशोधन क्षेत्रातील एकेक उच्च श्रेणी गाठत भारतातील एक चिकित्सक शास्त्रज्ञ इथपर्यंतचा डॉ. रामदास डामसे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास डोळे दिपवणारा आहे. डॉ. रामदास डामसे हे संशोधन क्षेत्रातील कार्यासोबत सल्लागार व व्याख्याता म्हणूनही कार्यरत आहेत. विवेकबुद्धी या शास्त्रज्ञाच्या ठायी असलेल्या महत्वाच्या गुण आधारावर डॉ. रामदास डामसे यांनी केलेले संशोधन समस्त मानवी जातीच्या कल्याणासाठी मदतगार ठरले आहे. यामुळेच डॉ. रामदास डामसे यांना पुणे विद्यापीठाने सन २००७ मध्ये कर्बरसायन आणि पर्यावरणशास्त्र या विभागामध्ये मान्यताप्राप्त मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.

डॉ. रामदास डामसे यांच्या महान कार्याची दखल घेऊनच बायोग्राफीक सेंटर, केंब्रीज, इंग्लंड यांनी संपूर्ण जगात प्रतिष्ठित म्हणून दिला जाणारा 'इंटरनॅशनल सायंटिस्ट ऑफ द इयर - २००७' या जागतिक स्तरावरील पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. 'लोबोमे' या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या शिफारसीने डॉ. रामदास डामसे यांच्या पाच शोध निबंधांचा जागतिक सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संगणक प्रणालीच्या आंतरराष्ट्रीय ज्ञानकोशात 'प्रा बुक' मध्ये डॉ. रामदास डामसे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे. 'संशोधन कट्टा' या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त समुदायामध्ये डॉ. रामदास डामसे यांचा समावेश आहे. याशिवाय 'आंतरराष्टीय वैज्ञानिक माहितीसंग्रह ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड', 'आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र विकास संस्था ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड, लंडन', 'डीआरडीओ वृत्तपत्र ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड - २००६', वाचकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार - २००७', 'उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार' आणि 'विश्वामध्ये कोण कुणाचे - २४ आवृत्ती असे आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ. रामदास डामसे यांना लाभले आहेत. याशिवाय पुणे महानगरपालिका सन्मान, नाशिकरत्न स्वराज्य पुरस्कार, सह्याद्रीभूषण पुरस्कार आणि असे अनेक स्थानिक पुरस्कार डॉ. रामदास डामसे यांना लाभले आहेत.

पुणे HEMRL येथील डीआरडीओमध्ये पस्तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सन २०१८ मध्ये सहसंचालक पदावरून शिवजन्मभूमीतील हे सुपुत्र डॉ. रामदास डामसे सेवानिवृत्त झाले. परंतु दुर्दैवाने त्याच आठवड्यात डॉ. डामसे यांचा एकुलता एक मुलगा पराग यांचे उच्च मधुमेह आणि हृदयविकार यामुळे आकस्मिक निधन झाले आणि एक मोठा आघात या कुटुंबावर झाला. डॉ. रामदास डामसे यांची पत्नी सौ. रेखा डामसे यासुद्धा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतच कार्यरत आहेत तर मुलगी जागृती या सुप्रसिद्ध सुपरस्पेशालिस्ट स्त्रीरोगतज्ञ आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था सामर्थ्यशाली बनविण्यासाठी अमूल्य योगदान देणारे डॉ. रामदास डामसे यांचे कार्यकर्तुत्व तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल.

विशेष सूचना - लेखाखालील मूळ लेखकाचे नाव डिलीट करून किंवा स्वतःचे नाव काॅपी पेस्ट करून पोस्ट शेअर करणे कायदेशीर सायबर गुन्हा आहे.

              ~ लेखक ~
      संजय वसंतराव नलावडे
             धोलवड, मुंबई
      मोबाइल - ८४५१९८०९०२
'निसर्गरम्य जुन्नर-भूमी गुणीजणांची'
  


0 comments :

Post a Comment

Thanks for your comment

 

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our School

Shri Gadge Maharah Ashram School, Otur is more than a home away home for our students. It is a place where we build the characters with the thoughts of Saint Gadge Maharaj.

LOGO

LOGO

Popular Posts

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Contributors

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Total Pageviews

Featured Post

एस एस परीक्षा 2023 निकालाची उत्तुंग परंपरा

गुणवत्तेची पताका फडकावत विद्यार्थी विकासात श्री गाडगे महाराज विद्यालय, ओतूर पुन्हा अव्वल... गुणवत्तेबरोबरच संस्कारांची व गाडगे बाबांच्या ...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • Wings of Fire
  • Hamlet
  • BHALAR

Followers

External Links