श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे

 



स्थापना:

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, कपर्दीकेश्वराच्या कुशीत व संत चैतन्य महाराजांची पावन भूमी असलेल्या ओतूर येथे श्री.प्रल्हादराव मारुतीराव पाटील साहेब यांनी गाडगे बाबांचा वारसा जपत जुन्नर, अकोले, मुरबाड, शहापूर, संगमनेर, मंचर, घोडेगाव या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाची अडचण सोडविण्यासाठी मोठ्या प्रयासाने श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूरची स्थापना केली. सुरुवातीला या विभागाचे नाव श्री गाडगे महाराज पोस्ट बेसिक आश्रमशाळा असे नाव होते. आजही अनेक माजी विद्यार्थी याच नावाने शाळेला ओळखतात.

 

          सन १९६० साली प्राथमिक आश्रमशाळेची सुरुवात केल्यानंतर अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागले होते. परंतु माध्यमिक शिक्षणाची निवासी सोय करण्याची अडचण होती. त्यामुळे अनेकदा इच्छा व गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थ्यांना प्राथमिक नंतर शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत होते. त्या काळात प्रवासाच्या साधनांची अडचण होती. लोकांचे आर्थिक उत्पन्न अगदीच कमी असल्याने दूर शहरी भागात मुलांना शिक्षणासाठी पाठवणे गोर गरीब आदिवासी पालकांना सहज शक्य होत नव्हते. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी श्री. प्रल्हादराव मारुतीराव पाटील साहेब यांनी जिल्हा परिषदेकडे माध्यमिक विभागाची मान्यता मिळावी म्हणून लेखी पाठपुरावा करायला सुरुवात केली होती.मान्यतामिळण्याच्या अगोदरच दूरदृष्टीकोन जपत श्री. प्रल्हादराव मारुतीराव पाटील साहेब यांनी वसतीगृहाच्या इमारतीचे काम पूर्ण केले होते.वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणीसाठी मा.बिरारी साहेब हे उपस्थित होते. तरइमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी तत्कालीन समाज कल्याण मंत्री मा.नामदार बाबुराव भारस्कर हे उपस्थित होते. सन १९६७ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्री झाल्यानंतर मा.बाबुराव भारस्कर यांनी २६ जानेवारी १९६८ रोजी श्री गाडगे महाराज आदिवासी वसतिगृहाचे ओतूर येथे उद्घाटन केले.वसतिगृहाचे काम पूर्णत्वास जात असतानाच श्री. प्रल्हादराव मारुतीराव पाटील साहेबांनी आश्रमशाळेच्या दुसऱ्या इमारतीचे काम देखील पूर्णत्वास नेले होते.या कार्यात ओतूरचे तत्कालीन सरपंच मा.श्री. श्रीकृष्ण रामजी तांबे यांची ओतूर ग्रामस्थांची खंबीर साथ लाभली होती.

 

 

     सर्वांगीण प्रयत्न व गाडगे बाबांचेविचार यांच्यामुळे श्री. प्रल्हादराव मारुतीराव पाटील साहेब यांच्या प्रयत्नांना यश येत सन १९७३ साली इयत्ता आठवी व दिनांक ३ ऑक्टोबर १९७४ रोजी इयत्ता नववीचा वर्ग सुरु करण्याची परवानगी मिळाली.मा.शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी पुढील वर्ग सुरु करण्याची परवानगी दिलेली असली, तरी वर्ग सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी अभिरुची दाखवणे आवश्यक होते.तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात पालक भेटी घेऊन माध्यमिक शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावून सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायला सुरुवात केली. कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या सुविधा नसताना शिक्षकांनी पायपीट करून या डोंगरदऱ्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम पार पाडले. त्याचेच फलित म्हणून गाडगे बाबांच्या विचारांनी व श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलाच्या संस्कारांनी घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.आजही शिक्षण व समाज घडविणारी पिढी तयार करण्याचे कार्य अविरतपणे या श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलात सुरु आहेत.एकंदरीतश्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे ब्रीद ‘सेवा परमो धर्म:’ हे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे काम श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे सुरु असून या कार्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

 

 

 

शाळेची संक्षिप्त माहिती :

·        शाळेचे नाव: श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर,

ता.जुन्नर, जि.पुणे, महाराष्ट्र – ४१२ ४०९

·        शाळेची स्थापना: जून १९७३

·        वर्ग: इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी

·        एकूण वर्ग संख्या: ३

·        शाळेचा युडायस नंबर: २७२५०७०६८१८

·        शाळेचा इमेल: oturashramshala@gmail.com

·        एस.एस.सी. शाळा संकेतांक: ११.०७.०३१

·        शाळेचा टॅन नंबर: PNES01706F

·        शाळेची एकूण जमिन क्षेत्रफळ: २.६० आर

·        मुख्याध्यापक: १

·        शिक्षक: ४

·        शिक्षकेतर कर्मचारी: ६

 

 

 

शाळेतील सोयी-सुविधा:

१)     वर्गखोल्या: शाळेतआदर्श वर्गखोल्या असून हवेशीर व प्रसन्न वातावरण असते. प्रशस्त वर्गखोल्या असून वर्गात पुरेसा सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची योग्य ती व्यवस्था केलेली आहे.त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना अध्ययन करताना कंटाळा येत नाही. वर्गातील विद्यार्थी पूरक बैठक व्यवस्था व बेंचेस असल्याने आनंददायी शिक्षण मिळण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरहजेरी कमी होण्यास मदत होते.

 

२)     ई लर्निंग: आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनुभूती देण्यासाठी तीनही वर्गात ई लर्निंगची सोय करण्यात आलेली आहे. सदर ई लर्निंग उपलब्ध करून देण्यासाठी मा.श्री.नितीन पाटील यांनी प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळत आहे. ई-लर्निंग वापरण्याबाबत शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेले असून त्याचा वापर गरज असेल तेव्हाच केला जातो.

 

३)     संगणक कक्ष: वर्गात ई लर्निंग उपलब्ध असले, तरी संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान अवगत होणे आवश्यक आहे. या हेतूने शाळेत स्वतंत्र संगणक कक्ष असून त्याचा लाभ विद्यार्थी आपले अध्ययन करत असताना घेतात.

 

४)     विज्ञान प्रयोगशाळा: विज्ञान विषयातील प्रयोग यशस्वीपणे विद्यार्थ्यांना करता आले पाहिजेत, त्यांच्यातील संशोधक जागृत झाला पाहिजे. या दृष्टीकोनातून शाळेत स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा असून त्यामध्ये शालेय अभ्यासक्रमातील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक नियमितपणे करून दाखवले जाते.विज्ञान विषय शिक्षक श्री प्रशांत फल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध विज्ञान प्रदर्शनात सहभागी होत असून इन्स्पायर अवार्ड उपक्रमात आज पर्यंत अनेक विद्यार्थी चमकलेले आहेत.

 

५)     वाचनालय: विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक वाचण्यासाठी प्रवृत्त केले जाते. शाळेत नियमित दै.लोकमत, दै.पुढारी, दै.सकाळ इत्यादी वर्तमानपत्रे विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.

 

६)     ग्रंथालय: शाळेमध्ये स्वतंत्र ग्रंथालय असून त्यामध्ये विविध विषयांवर आधारित हजारो पुस्तके आहेत. या ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर विद्यार्थी नियमितपणे करतात.

 

७)     क्रीडा विभाग: आदिवासीविद्यार्थ्यांमध्ये उपजत कला गुण असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना नक्कीच याचा लाभ होतो. शाळेमध्ये स्वतंत्र क्रीडा साहित्यासाठी खोली असून त्यामध्ये विविध प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्याचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. शाळेला भव्य क्रीडांगण असल्याने दररोज विद्यार्थी या क्रीडांगणावर विविध खेळ खेळतात.दररोजसकाळीविद्यार्थ्यान्कडून योगासने, व्यायाम करून घेतला जातो.दरवर्षी शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे शाळेत आयोजन केले जाते. तसेच प्रकल्प, विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत आमचे विद्यार्थी सहभागी होतात. आता पर्यंत विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.माध्यमिक शिक्षक श्री. अरुण खुळे यांच्या मार्गदर्शनखाली आज पर्यंत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत भाग घेऊन पारितोषिके मिळवलेली आहेत.

 

८)     आरोग्य: आनंददायी शिक्षणासाठी फक्त वर्गात वर्गात वातावरण प्रसन्न असून चालत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्यदेखील जपले जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे नियमितपणे लक्ष्य दिले जाते. योग्य आहार व पाणी उपलब्ध करून दिले जाते. आजारी विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ओतूर येथे उपचारासाठी पाठविले जाते. तसेचगरज असल्यास खाजगी दवाखान्यातदेखील उपचारासाठी विद्यार्थ्यांना पाठविले जाते.विद्यार्थ्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी एका वर्ग चार कर्मचा-यावर जबाबदारी दिली जाते.

 

९)     सहशालेय उपक्रम: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेत नियमितपणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, वस्तू निर्मिती स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले जाते. दरवर्षी होणारे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात.विविध महापुरुषांच्या जयंत्या व पूण्यतिथ्या साजऱ्या करून विद्यार्थ्यांच्या मनात या महानायकांचे विचार बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो.

          प्रकल्पस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे बक्षिस शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे.

 

१०) गुणवत्ता:  ओतूर व परिसरात शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पालकही जागृत झाल्याने आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्णशिक्षण देण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. वाचन-लेखन प्रकल्प, पाढे प्रकल्पअसे विविध प्रकल्प शाळेत राबवले जात आहेत. इयत्ता ८ वीच्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले जाते व त्यांच्या नियमितपणे जादा तासिका घेऊन त्यांना परीक्षेसाठी तयार केले जाते.इयत्ता १० वीच्या वर्गाचा निकाल उंचावण्यासाठी जादा तास, रात्र अभ्यासिका, वैयक्तिक मार्गदर्शन, सराव परीक्षा, अतिरिक्त प्रश्नसंच सोडवून घेणे, विद्यार्थी पालक सभा घेऊन पालकांचे प्रबोधन करून विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी पालकांची मदत घेतली जाते.

 

११) सोयी सुविधा: शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व निवासाची सोय उपलब्ध करून दिलेलीआहे. विद्यार्थ्यांनादोन वेळचासकस आहार, नाष्टा, दोन गणवेश, नाईट ड्रेस, अंथरूण-पांघरुण,तेल, साबण, दंत मंजन, ताट, वाटी, शालेय पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास यांचे वाटप केले जाते.

 

१२) शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा: विद्यार्थ्यांना बारमाही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंट टाकी बसवण्यात आलेली आहे. या पाण्याच्या टाकीची क्षमता १५००० लिटर इतकी आहे. सदर टाकीची नियमितपणे स्वच्छता केली जाते.

 

१३) गरम पाण्याची सुविधा: विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी बंब बसविण्यात आलेले आहेत.सदरबंब बसविण्यात आल्याने विद्यार्थी दररोज आंघोळ करतात व स्वताची वैयक्तिक स्वच्छता राखतात. त्यामुळे त्वचेचे होणारे विविध आजार कमी झालेले आहेत.

 

१४) आदिवासी संस्कृती संवर्धन: इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी हे आदिवासी समाजातील असल्याने आदिवासी संस्कृती संवर्धन कार्यक्रम घेण्यासाठी एक वेगळी संधी असते. महानायक बिरसा मुंडा, तंट्या भिल, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, राणी दुर्गावती इत्यादी आदिवासी क्रांतीकारकांच्या जयंती व पूण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.आदिवासी मुलांमध्ये आपला इतिहास, संस्कृती, बोली भाषा, चालीरीती, हक्क अधिकार, क्रांतिकारक यांची जाणीव जागृती होण्यासाठी या कार्यक्रमांचेविशेष महत्त्व आहे.दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनी पाना-फुलांचा, दगडांचा वापर करून सुबक अशी रांगोळी काढून आदिवासी संस्कृतीचे मूल्य जोपासतात. दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजीच्या जागतिक आदिवासी दिनाच्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षक श्री राजू ठोकळ यांनी आदिवासी क्रांतिकारक रामजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित संशोधनपार पावरपॉइंट सादरीकरण तयार केले.

 

१५) चित्रकला प्रदर्शन: वर्षभर विविध दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आपल्या कल्पकतेचा वापर करून सुंदर चित्र काढतात. या चित्रांचे प्रदर्शन दरवर्षी 20 डिसेंबर रोजी शाळेत आयोजित केले जाते.

 

१६) वैयक्तिक स्वच्छता: आश्रमशाळेतील विद्यार्थी आपल्या पालकांपासून दूर येथेच वसतिगृहात राहत असल्याने त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचा आहार, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष्य द्यावे लागते. वैयक्तिक स्वच्छतेकडे शाळेतील अधिक्षक, अधीक्षिका, वर्गशिक्षक हे विशेष लक्ष्य देत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

 

१७) लेझीम व झांज पथक सादरीकरण: संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज यांची पूण्यतिथी 20 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी केली जाते. या पूण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त ओतूर गावातून बाबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत माध्यमिक आश्रमशाळेचे विद्यार्थी सुंदर असे लेझीम व झांज पथकाचे सादरीकरण करतात.

 

१८) नियमित फलक लेखन: शिक्षण प्रक्रियेत फलक लेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु बहुतांशी वेळा शिक्षक हे फलक लेखन करताना दिसून येतात. आपल्या शाळेत प्रत्येक वर्गात भिंतीवर फलक बसवण्यात आलेले असून त्यावर विद्यार्थ्यांना आवडेल त्या आशयाचे फलक लेखन करण्याची त्यांना संधी दिली जाते. यातून विद्यार्थ्यांची चौकस विचार करण्याची वृत्ती वाढीस लागते.

 

१९) शालेय परिपाठ: शाळेत सोमवार ते शुक्रवार नियमितपणे शालेय परिपाठ सादर करण्याचे काम विद्यार्थी करतात. यामध्ये सुविचार, दिन विशेष, बोधकथा, बातम्या, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इंग्रजी शब्द, पाढे, समूहगीत इत्यादींचे सादरीकरण करतात. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचा यात सहभाग असेल याचे नियोजन गटनिहाय केले जात असल्याने विद्यार्थ्यांना आपले कलागुण जोपासण्याची चांगली संधी यानिमित्ताने मिळते.

 

२०) विद्यार्थी समुपदेशन: शाळा,अभ्यास,विद्यार्थी,शिक्षक व अभ्यासक्रम ह्या गोष्टीशिवाय शाळेमध्ये अनेक गोष्टी असतात. शाळेत पुस्तक, अभ्यास, अभ्यासक्रम व भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांबरोबरच एक वेगळं नातं असतं ते समुपदेशकाचं. समुपदेशन आणि शाळा त्यातल्या त्यात खास करून आश्रमशाळायामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आश्रमशाळेतील किशोरवयीन विद्यार्थी हे वसतिगृहात राहत असल्याने आपल्या शारीरिक बदलांमुळे निर्माण होणारे प्रश्न कोणाला विचारायचे या विवंचनेत असतात. घरी गेल्यावर आईला किंवा वडिलांना मनातल्या अडचणी व्यक्त करण्याची संधी देखील या मुलांना नसते. अशावेळी हि मुलं सैरभैर होऊ नयेत यासाठी शाळेत दर पंधरा दिवसांनी विद्यार्थ्यांचेसमुपदेशनकेले जाते. यासाठी वेळोवेळी बाह्य तज्ञांनामार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते.

 

२१)  क्षेत्र भेट: विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिकठिकाणांना भेट देता यावी यासाठी रीतसर परवानगी घेऊन क्षेत्र भेटींचे आयोजन केले जाते. या अगोदर जीएमआरटी खोडद, कळसुबाई शिखर, रतनगड, भंडारदरा, चावंड किल्ला, नाणे घाट, शिवनेरी किल्ला, रंधा धबधबा अशा विविध ठिकाणी क्षेत्र भेटीसाठी नेण्यात आलेले आहे.

 

 

 

 

 

आमचे गुणवंत विद्यार्थी : 

श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा निकाल नेहमीच चांगला लागत आलेला आहे. बदलत्या काळानुसार येणा-या आव्हानांना तोंड देत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.दरवर्षी एसएससी परीक्षेच्या निकालाचा आलेख उंचावत जाणारा आहे. आज पर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे मिळालेली आहेत. त्यातीलविशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.

 

१)     भोईर शीला खंडू एसएससी परीक्षा मार्च २००६ मध्ये विभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून द्वितीय आल्याने तिला अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून २५,०००/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.

 

२)     मते विनोद तुकाराम- एसएससी परीक्षा मार्च २००८ मध्ये विभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून द्वितीय आल्याने तिला अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून २५,०००/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.

 

३)     ठोंगिरे तुकाराम लक्ष्मण- एसएससी परीक्षा मार्च २००९ मध्ये विशेष गुणांसह उत्तीर्ण झाल्याने अपर आयुक्त, मा.श्री. करवंदे साहेब, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून विशेष सन्मान करण्यात आला व २०,०००/- रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

 

४)     घोडे वनिता दुन्दा- एसएससी परीक्षा मार्च २०१४ मध्ये विभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून तृतीय आल्याने तिला अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्यावतीने विशेष सन्मान करून १५,०००/- रुपयांचे बक्षिस देण्यात आले.तसेच आदिवासी विकास मंत्री मा. श्री. मधुकरराव पिचड साहेब यांच्यावतीने गौरविण्यात आले.

 

५)     हगवणे दिपाली रामदासएसएससी परीक्षा मार्च २०१८ मध्ये विभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून मुलींमध्ये प्रथम आल्याने तिला अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून २५,०००/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. तसेचविभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून मुलींमध्ये राज्याततृतीय आल्याने तिला अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून ३५,०००/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.

 

 

६)     वाघ रोहिदास कान्हू- एसएससी परीक्षा मार्च २०१८ मध्ये विभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून मुलांमध्ये द्वितीय आल्याने अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून २५,०००/-रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.

 

७)     भोईर रवींद्र रावजी- एसएससी परीक्षा मार्च २०१८ मध्ये विभागीय मंडळ पुणे यात आदिवासी विभागातून मुलांमध्ये तृतीय आल्याने अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्याकडून २०,०००/-रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.

 



0 comments :

Post a Comment

Thanks for your comment

 

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our School

Shri Gadge Maharah Ashram School, Otur is more than a home away home for our students. It is a place where we build the characters with the thoughts of Saint Gadge Maharaj.

LOGO

LOGO

Popular Posts

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Contributors

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Total Pageviews

Featured Post

एस एस परीक्षा 2023 निकालाची उत्तुंग परंपरा

गुणवत्तेची पताका फडकावत विद्यार्थी विकासात श्री गाडगे महाराज विद्यालय, ओतूर पुन्हा अव्वल... गुणवत्तेबरोबरच संस्कारांची व गाडगे बाबांच्या ...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • Wings of Fire
  • Hamlet
  • BHALAR

Followers

External Links